भिवंडी, दि. ११ (प्रतिनिधी) : भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या शुक्रवारी काढलेल्या प्रचाररॅलीने भिवंडी शहर दुमदुमले. महायुतीच्या जयजयकाराच्या घोषणांमध्ये झेंडूच्या पाकळ्यांची उधळण आणि ठिकठिकाणी आरती करीत नागरिकांनी कपिल पाटील यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचे स्वागत केले. या उत्स्फूर्त स्वागताने महायुतीच्या प्रचार रॅलीला विजयी रॅलीचे स्वरूप आले होते.
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी वाडा, शहापूर, मुरबाडमध्ये काढलेल्या यात्रांना ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला होता. कपिल पाटील यांच्या प्रचारफेरीतील गर्दीत सातत्याने वाढ होत आहे. भिवंडी शहरातील पूर्व व पश्चिम भागात काढलेल्या रॅलीलाही ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीचे फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि बॅंजेोच्या सूरात स्वागत केले गेले. महायुतीच्या भव्य रॅलीत भिवंडीकर नागरिक व कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह, जल्लोष आणि विश्वासाची अनुभूती पाहावयास मिळाली. या रॅलीमध्ये भाजपाचे आमदार महेश चौघुले, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, भाजपाचे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संतोष शेट्टी, शहराध्यक्ष हर्षल पाटील, माजी नगराध्यक्ष मदनबुवा नाईक,ज्येष्ठ माजी नगरसेवक बाळाराम चौधरी, मनसेचे लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी, माजी नगरसेवक श्याम अगरवाल, सुमित पाटील यांच्यासह महायुतीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
भिवंडीतील नागरिकांबरोबर कपिल पाटील यांनी संवाद साधला. तसेच दहा वर्षांत केलेल्या कार्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून भिवंडीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर दिला. ठाण्याहून भिवंडीला येणाऱ्या मेट्रोचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, लवकरच उर्वरित काम पूर्ण होईल. माजिवडा-वडपे महामार्गाच्या कामामुळे वाहतूककोंडी संपुष्टात येईल. तर रांजणोली, माणकोली आणि दुर्गाडी पुलामुळे वाहतूककोंडीतून दिलासा मिळाला, याकडे कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भिवंडीत विकासाचे नवे पर्व सुरू झाल्याचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी नमूद केले.
भिवंडी शहरात दोन टप्प्यात रॅली निघाल्या. भिवंडी पूर्व मतदारसंघाची रॅली रांजणोली नाक्यावरील श्री साईबाबा मंदिरापासून सुरू झाली. भादवड, टेमघर, नवी वस्ती, अशोक नगर, नागाव, गायत्रीनगर, चाविंद्रा, पद्यानगर, मानसरोवर, कामतघर, ताडाळी परिसरातून वाजतगाजत रॅली गेली. तर सायंकाळी दुसऱ्या टप्प्यात अंजुरफाटा, खारबाव, नारपोली, धामणकर नाका, गौरीपाडा, टिळक चौक, अजय नगर, गोकुळनगर, कोंबडपाड्याहून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाप्त झाली.
दुसऱ्या टप्प्यात पश्चिम भागात सायंकाळी काढलेल्या प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ताडाळी येथून निघालेल्या रॅलीत समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या व महायुतीच्या जयजयकाराच्या घोषणांमध्ये प्रचार रॅलीच्या प्रतिसादात उत्तरोत्तर वाढ होत गेली. यानिमित्ताने संपूर्ण वातावरण महायुतीमय झाल्याचे पाहावयास मिळाले.