भारत सरकारचे जलशक्ती मंत्रालय आयोजित ‘सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024’ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगरपालिकेस देशात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथील विशेष समारंभात महामहीम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मूर्मू यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांनी हा मानाचा पुरस्कार स्विकारला. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.श्री.सी.आर. पाटील, केंद्रीय जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री ना.श्री.व्ही.सोमन्ना, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री ना.डॉ.राजभूषण चौधरी, केंद्रीय जलशक्ती मंत्रालय अंतर्गत जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरूज्जीवन विभागाचे सचिव श्री.व्ही.एल कंथाराव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी अति.शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या या पुरस्कारप्राप्त यशामध्ये उल्लेखनीय जल व्यवस्थापन आणि पाण्याचा पुनर्वापर विषयक खालील महत्वाच्या बाबींची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आलेली आहे.
नवी मुंबई शहर स्वत:च्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसमृध्द शहर असून पाण्याचा पुनर्वापर केला जात असल्याने पिण्याच्या पाण्याची लक्षणीय बचत होत आहे. नवी मुंबई शहर पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असल्याची विशेष नोंद परीक्षण समितीने घेतली.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मिटरींग पध्दतीव्दारे मोजमाप होत असल्याने जलवितरण प्रणाली सक्षम आहे.
महानगरपालिकेमार्फत पारदर्शक आणि कार्यक्षम अशी सर्व डिजीटल पर्याय उपलब्ध असणारी बिलींग प्रणाली कार्यान्वित आहे. त्यामुळे 96 % पर्यंत देयक वसूलीचे उत्तम प्रमाण आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन निर्माण होणा-या सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया केली जाते.
याकरिता अत्याधुनिक एसबीआर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत असून 454 द.ल.लि. क्षमतेची 7 मलप्रक्रिया केंद्रे कार्यान्वित आहेत.
या शिवाय 52.5 द.ल.लि. क्षमतेचे 4 टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्प कार्यान्वित असून अल्ट्राफिल्टरेशन व यूव्ही तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रियाकृत पाण्यावर अधिक उच्चतम दर्जाची पुनर्प्रक्रिया केली जात आहे.
या टर्शिअरी ट्रिटमेंट केलेल्या पाण्याच्या पुनर्वापर उद्योगसमुहांमध्ये पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी करण्याकरिता एमआयडीसी सोबत धोरणात्मक सामंजस्य करार करण्यात आलेला असून सद्यस्थितीत 64 उद्योगसमुहांना पुनर्प्रक्रियाकृत पाणी पुरविले जात आहे.
यासोबतच आरएमसी प्लान्टमध्ये, उद्याने, सुशोभित जागा व रस्ते दुभाजक फुलविण्यासाठी, कारंजे करिता, धूळ प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी वाहनांमध्ये व रस्ते धुण्यासाठी हे पाणी उपयोगात आणले जात आहे. बांधकाम साईट्स याठिकाणी या पाण्याचा वापर अनिवार्य करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे पिण्याव्यतिरिक्त इतर घरगुती कामांकरिता प्रक्रियाकृत पाणी वापरात आणले जात आहे.
नवी मुंबईत निर्माण होणा-या नवीन इमारतींमध्ये पाण्याच्या दोन टाक्या असणार असून जलवाहिन्या देखील दोन वेगवेगळ्या असणार आहेत. यामध्ये एक टाकी व जलवाहिनी ही पिण्याच्या पाण्यासाठी असेल आणि दुसरी टाकी व जलवाहिनी ही पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त फ्लशींग व इतर गोष्टींसाठी वापरावयाच्या प्रक्रियाकृत पाण्याची असेल. अशाप्रकारची कार्यवाही करणारी नवी मुंबई ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे.
नवी मुंबईमध्ये पाण्याचा उपव्यय टाळण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबविण्यात येत असून पाणी गळतीचे प्रमाणही कमी आहे. त्या अनुषंगाने उत्पन्न विरहित पाण्याचे (NRW) मानक प्रमाण 20% पर्यंत असले तरी नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रमाण त्यापेक्षा कमी आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची सुयोग्य जलवितरण प्रणाली आणि पाण्याचा पुनर्वापर अशा उल्लेखनीय बाबींचा विचार राष्ट्रीय जलपुरस्कारासाठी करण्यात आला. जलशक्ती मंत्रालय अंतर्गत जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरूज्जीवन विभागामार्फत देण्यात येणा-या या पुरस्काराकरिता देशभरातून 751 प्रस्ताव प्राप्त होते. त्या प्रस्तावांची जलसंपदा विभागाकडून तपासणी करण्यात आली तसेच केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळ यांनी प्रत्यक्ष भेटी देत पाहणी करून तपशीलवार अहवाल सादर केले. त्यानंतर स्वतंत्र निर्णायक मंडळाने पारदर्शक स्कोअरकार्ड प्रणाली वापरून त्रयस्थ ज्युरी समितीव्दारे मूल्यांकन केले. या मूल्यांकनाच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली असू स्थानिक स्वराज संस्था गटात नवी मुंबई महानगरपालिका देशात प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय जलपुरस्काराची मानकरी ठरली आहे. त्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे उपक्रम हे अमृत योजना आणि ड्रिंक फ्रॉम टॅप अशा राष्ट्रीय धोरणांशी सुसंगत आहेत. तसेच महानगरपालिकेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण जलसंधारण उपाययोजना, सांडपाणी पुनर्वापर उपक्रमातून पर्यावरण संरक्षणासोबतच पिण्याच्या पाण्याची बचत, शहरी भागात सुनियोजित आणि शाश्वत पाणी व्यवस्थापन अशा विविध बाबींमुळे देशातील इतर शहरांसाठी अनुकरणीय जलव्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन करणारे शहर म्हणून प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने नावाजले गेले आहे.
नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले नागरिकांचे अभिनंदन!
नवी मुंबई महानगरपालिकेचे नियोजनबध्द पाणीपुरवठा व्यवस्थापन व पाण्याचा पुनर्वापर या महत्वाच्या बाबींचा सर्वंकष विचार करून अग्रगण्य स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा मानाचा राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी मुंबई शहराचा राष्ट्रीय पातळीवर झालेला हा गौरव शहराची मान उंचावणारा असून त्याबद्दल आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदयांनी ट्विट करून नवी मुंबईचे अभिनंदन केले होते. पुरस्काराच्या या यशात मुख्यमंत्री महोदय व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय तसेच वन मंत्री महोदय आणि खासदार महोदय व आमदार महोदय अशा सर्व लोकप्रतिनिधींचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन याचा महत्वाचा वाटा असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.*
नवी मुंबईच्या नियोजनबध्द, कार्यक्षम व शाश्वत जल प्रणालीचे यश म्हणजे हा देशात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार असून यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा महत्वाचा वाटा असल्याचे सांगत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत. यापुढील काळात महानगरपालिका शहर विकासाला सुसंगत धोरणात्मक वाटचाल करेल व भविष्यातील पिढ्यांचा विचार करून दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यावर भर देईल व त्यामध्ये सर्व नागरिकांचे सहकार्य लाभेल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
