मालमत्ता कर भरून सहकार्य करणाऱ्या औद्योगिक संस्थेचा महापालिकेकडून सन्मान

पनवेल : नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरुन महापालिकेच्या विकासाचे भागीदार बनण्याचे आवाहन आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी केले होते, या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल महानगरपालिकेला मालमत्ता कर भरण्यासंदर्भात औद्योगिक क्षेत्रातून उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. नुकतेच खारघर येथील भारत पेट्रोलियमने आपला 1 कोटी 10 लाख 96 हजार रूपयांचा मालमत्ता कर भरला. याबद्दल उपायुक्त गणेश शेटे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.

गेल्या महिनांभरापासून पनवेल,कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, नवीन पनवेल या सर्व भागांतून विविध औद्योगिक संस्था तसेच निवासी मालमत्ताधारक लाखोच्या घरात असलेला आपला मालमत्ता कर भरत आहेत. यामध्ये मुख्यत्वाने भारत पेट्रोलियम , टाटा स्टील, सेंट्रल ऑईल, जी ॲन्ड टी ऑईल स्टेट इंडस्ट्रिज,सकाळ पेपर्स, धारक एन सुंदरलाल अँड कंपनी तसेच निवासी मालमत्ताधारकांमध्ये भूमी गार्डनिया को-ऑप हाऊसिंग सोसायटी ,ज्वेल एकविरा, गुडवील पॅराडाईज, पायल हाईट्स को – ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, गॅलेक्सी को -ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, निसर्ग आर्केड को -ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, यासर्वांनी आपला लाखोंचा मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य केले आहे.

मा. मुंबई उच्च् न्यायालयाने मालमत्ता कर वसुलीला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. याचबरोबर मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे रहिवासी क्षेत्रातील मालमत्ता धारक तसेच औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ता कर धारक मोठ्या प्रमाणात आपला मालमत्ता कर भरत असल्याचे दिसून येत आहे.

येत्या काळामध्ये महानगरपालिकेने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. विविध विकास कामांमध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचे किक्रेट प्रशिक्षण केंद्र, समाज मंदिरे, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत कोयनावळे, करवले,धानसर, रोडपाली, बौध्दवाडा येथील पायाभूत सुविधांची कामे मा. आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने पूर्ण होत आहेत. प्रस्तावित कामांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये नागरीकांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी 450 खाटांचे सुसज्ज माता व बाल संगोपन रुग्णालय “हिरकणी” या नावाने प्रस्तावित करण्यात आलेले आहे. तसेच 75खाटांचे कळंबोली येथे सुसज्ज रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर नवीन मुख्यालय बांधणे, एलईडी पथदिवे बसविणे.तळोजे, पाचनंद येथील तलाव परिसराचे सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. यामुळे पनवेलच्या वैभवामध्ये भर पडणारआहे. याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुद्देशिय सभागृह बांधण्यात येणार आहे.

या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे. तसेच मा. न्यायालयानेही मालमत्ता कर,वसुलीला स्थगिती दिली नाही.त्यामुळे नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरुन महापालिकेच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *