ना बॉडी सापडली, ना डीएनए जुळला; मुंबईतील बेपत्ता विद्यार्थिनी प्रकरणात आता लास्ट सीन थिअरी

मुंबई : एमबीबीएसचे शिक्षण घेणारी पालघर येथील बेपत्ता विद्यार्थिनी सदिच्छा साने प्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा येत्या काही दिवसांत आरोपपत्र दाखल करणार आहे. सदिच्छाचा मृतदेह अद्याप सापडलेला नसल्यामुळे आणि डीएनए पुरावा नसल्यामुळे अटकेतील आरोपी मिथ्थू सिंग तिच्या हत्येत सहभागी होता हे सिद्ध करण्यासाठी पोलीस ‘अखेरचे पाहणारा’ या सिद्धांतावर अवलंबून आहेत. मिथ्थू सिंग वांद्र्यातील बँडस्टँड येथे असलेल्या चायनीज स्टॉल चालवतो. ‘अखेरचे पाहणारा’ हा सिद्धांत म्हणजेच लास्ट सीन थिअरी. या हत्या प्रकरणात आपण सहभागी नव्हतो, हे सिद्ध करण्याची जबाबदारी मिथ्थू सिंग याच्यावर असेल. सध्या मिथ्थू आणि त्याचा मित्र जब्बार अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली असून ते तुरुंगात आहेत.

“आम्ही येत्या काही दिवसांत आरोपपत्र दाखल करणार आहोत. आम्ही ‘लास्ट सीन थिअरी’वर विसंबून आहोत, कारण आम्ही दोन हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांनी सदिच्छा आणि मिथ्थू यांना २९ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री बँडस्टँडवर एकत्र पाहिलं होतं, त्यानंतर ती बेपत्ता झाली होती” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितल्याचे वृत्त मिड-डेच्या वेबसाईटवर देण्यात आले आहे.

अलिकडेच, सुप्रीम कोर्टाने एका खून खटल्यातील आरोपीची शिक्षा कायम ठेवली. एकदा पीडित (मयत) व्यक्तीला आरोपीसोबत शेवटचे पाहिले असल्याचे सिद्ध झाले की, आरोपीला तो केव्हा आणि कोणत्या परिस्थितीत त्या (मयत) व्यक्तीपासून दूर गेला, हे स्पष्ट करावे लागते, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होतं.

याशिवाय सदिच्छा साने बेपत्ता झाल्याच्या रात्री बँडस्टँडवर ती आणि मिथ्थू यांनी सेल्फी घेतल्याचं समोर आलं होतं. तसंच मिथ्थूसारखा दिसणारा एक व्यक्ती ट्यूब फ्लोटसह बॅंडस्टँडकडे घाईघाईने चालत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना सापडले आहे

“आम्ही फुटेजचा दर्जा सुधारण्यासाठी वैज्ञानिक साधनं वापरत आहोत, जेणेकरून फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती मिथ्थू सिंग आहे की नाही, याची आम्हाला खात्री होईल” असेही पोलीस अधिकारी म्हणाले.

पोलिसांना अद्याप सदिच्छा साने हिचा मृतदेह सापडलेला नाही. या व्यतिरिक्त, मिथ्थू सिंगच्या निवासस्थानातून सापडलेल्या फ्लोट ट्यूबवर आढळलेले रक्ताचे डाग हे तिच्या पालकांकडून गोळा केलेल्या डीएनए नमुन्यांशी जुळत नाहीत.

पोलिसांनी यापूर्वी लाय डिटेक्टर चाचणीत कोणतेही मोठे दुवे न आढळल्यावर मिथ्थूला क्लीन चिट दिली होती, असा आरोप करत सदिच्छाचा मारेकरी तोच असल्याची खात्री नसल्याचंही सदिच्छाचे पालक म्हणाले.

सदिच्छा साने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजून ५८ मिनिटांनी विरार रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये चढली आणि अंधेरीला उतरली, कारण तिला जेजे हॉस्पिटलमध्ये दुपारी दोन वाजता प्रिलिमसाठी हजर व्हायचे होते. तिथून ती दुसर्‍या ट्रेनमध्ये चढली आणि वांद्रे येथे उतरली तिथून तिने रिक्षाने बँडस्टँड गाठलं. बेपत्ता होण्यापूर्वी तिने संपूर्ण दिवस त्याच भागात घालवल्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *