सेवा शुल्काची आकारणी व पायाभूत सुविधांचे सिडकोतर्फे पनवेल महापालिकेस हस्तांतरण

*सेवा शुल्काची आकारणी व पायाभूत सुविधांचे सिडकोतर्फे पनवेल महापालिकेस हस्तांतरण*

सिडकोतर्फे पनवेल महापालिकेस सेवा शुल्काची आकारणी व पायाभूत सुविधांच्या हस्तांतरणाच्या सामंजस्य करारनाम्याचे आज दिनांक 10 मार्च 2023 रोजी *श्री. एकनाथ शिंदे, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व श्री. देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य* यांच्या समक्ष आदान प्रदान करण्यात आले. या प्रसंगी *श्री. मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव (महाराष्ट्र राज्य), श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री कार्यालय), श्री. श्रीकर परदेशी, सचिव, मा. उपमुख्यमंत्री कार्यालय, डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. गणेश देशमुख, आयुक्त पनवेल महानगरपालिका, श्री. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, श्री. प्रशांत ठाकूर, आमदार, श्री. महेश बालदी, आमदार तसेच सिडको व पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी* उपस्थित होते.

सिडकोतर्फे नवी मुंबई क्षेत्रात नवीन पनवेल (पू) व (प), काळुंद्रे, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे व खारघर नोड पायाभूत सुविधांसह विकसित करण्यात आले आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या निर्मितीनंतर सदर नोड व तेथील पायाभूत सुविधा पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

*“यामुळे नागरिकांना उच्च दर्जाच्या नागरी सुविधा सुलभतेने प्राप्त होणार आहेत. सिडकोने मुख्यतः सर्व सोयी, सेवा व सुविधांवर भर देऊन पनवेल महानगरपालिका क्षेत्रात स्वयंपूर्ण व परिपूर्ण नोड्स विकसित केले असून यापुढे या सुविधांना सुरळीत व अखंडपणे पुरवण्याची जबाबदारी आता पनवेल महानगरपालिकेची आहे.”*
*श्री. एकनाथ शिंदे*
*मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य*

*“सिडकोकडून पनवेल महानगरपालिकेला सेवा हस्तांतरित करण्यात आल्यामुळे पनवेल महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास हातभार लागून भविष्यकाळातील नियोजन सुरळीतपणे करण्यास निश्चितपणे मोठा हातभार लागणार आहे.”*
*श्री. देवेंद्र फडणवीस*
*मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य*

*“शहरे वसवणाऱ्या सिडकोने नेहमीच या शहरांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यास प्राधान्य दिले आहे. याच अनुषंगाने या सुविधांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. यापुढे आता सिडको महामंडळ नगरविकासातील नवनवीन शिखरे पादाक्रांत करेल.”*
*डॉ. संजय मुखर्जी*
*उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको*

या नोडमधील घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, पावसाळी गटारे, पदपथ, होल्डींग पॉन्ड्स, दफन भूमी, स्मशान भूमी, समाज मंदिरे, अग्निशमन केंद्रे, सार्वजनिक कार्यक्रम, दैनिक बाजारपेठ व अन्य वापरांसाठीचे भूखंड, मलनि:सारण वाहिन्या व विद्युत सेवा या पायाभूत सुविधा पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात आल्या असून त्यासंदर्भातील करारनामा करण्यात आला आहे. याचबरोबर महापौर/आयुक्त निवास व पनवेल महानगरपालिका कार्यालयासाठीचे भूखंडदेखील हस्तांतरित करण्यात आले आहेत.

त्या अनुषंगाने दिनांक 01 नोव्हेंबर 2022 पासून सिडकोने पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सेवा शुल्क आकारणे बंद केले असून सदर तारखेपासून वरिल नोडच्या विकास आणि देखभालीची संपूर्ण जबाबदारी ही पनवेल महानगरपालिकेची आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *