चॉकलेटच्या बहाण्याने भिन्नमती मुलीसोबत घृणास्पद कृत्य; दोन सख्ख्या भावांना अटक

नवी मुंबई : दिघा परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन भिन्नमती मुलीला दोघा सख्ख्या भावांनी गाडीमधून दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर गाडीमध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अखिलेश पासी (४१) व त्याचा भाऊ संतोष पासी (४६) अशी दोघा नराधमांची नावे असून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्यांचा सीसीटीव्हींच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांना २४ तासांच्या आत अटक केली आहे.या प्रकरणातील पीडित १७ वर्षीय मुलगी भिन्नमती असून ती दिघा परिसरात राहण्यास आहे. तर, तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींपैकी मुख्य आरोपी अखिलेश पासी हा मुंबईत शिवडी येथे राहण्यास आहे. त्याचा मोठा भाऊ संतोष हा दिघा परिसरात राहतो. २५ जानेवारी रोजी अखिलेश हा गाडी घेऊन मोठ्या भावाकडे आला होता. रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास दोघे भाऊ गाडीमधून जात असताना त्यांना ईश्वर नगरमधून पीडित मुलगी जाताना दिसली. ही मुलगी भिन्नमती असल्याची माहिती संतोष याला होती. त्यामुळे त्याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिला गाडीमध्ये बसवले. त्यानंतर या दोघा भावांनी तिला मुकुंद कंपनीजवळ निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर संतोष तिथून निघून गेल्यानंतर अखिलेश याने या पीडित मुलीवर बलात्कार केला. यावेळी मुलीने त्याला विरोध करून आरडाओरड सुरू केल्यानंतर अखिलेश याने रात्री सव्वादहाच्या सुमारास तिला पुन्हा ईश्वर नगर परिसरात उभ्या असलेल्या रिक्षामध्ये बसवून तेथून पलायन केले.

पीडित मुलगी दोन तास झाल्यानंतरही घरी न परतल्याने पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, साडेदहाच्या सुमारास ती रडत घरी परतल्यानंतर तिने घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अपहरण, बलात्कार व पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी अखिलेश व संतोष या दोघांना ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, पोलिस उपनिरीक्षक दीपक शेळके व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *