नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ही 15 जानेवारी 2026 रोजी संपन्न होत असून निवडणूक विषयक कामकाज पारदर्शक पध्दतीने आठही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये सुरु आहे. यामध्ये घणसोली निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीम. कल्पना गोडे ह्या निवडणूक विषयक कर्तव्य बजावत असतांना त्यांना एका व्यक्तीकडून निवडणूक प्रक्रियेत बेकायदेशीर हस्तक्षेप, दबाव व धमकी आणि त्यांची बदनामी करण्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला आहे. हे कृत्य निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेचा (Model Code of Conduct) भंग असून निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता, पारदर्शकता आणि पवित्रता धोक्यात आणणारी बाब आहे.
सदर प्रकरणाच्या प्राथमिक तपासात संबधित व्यक्तीने थेट निवडणूक कामकाजात दबाव टाकणे, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या खाजगी भ्रमणध्वनी / व्हॉट्स ॲपवर संपर्क साधून धमकी देणे तसेच त्यांच्याबाबत व्देषपूर्ण व बदनामीकारक मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित करणे असे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात, घणसोली विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाची कायदेशीररित्या पुढील चौकशी सुरू आहे.
सदर प्रकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे की, नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया संपूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने सुरु आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा कोणत्याही निवडणूक कर्मचाऱ्यावर दबाव, धमकी, बदनामी अथवा कामकाजात हस्तक्षेप केल्यास कोणतीही सूट दिली जाणार नाही आणि अशा प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
निवडणूक प्रक्रिया ही घटनात्मक जबाबदारी असून तिच्या अंमलबजावणीदरम्यान कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य व गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने सर्व नागरिक, राजकीय पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की, कायद्याचे पालन करून निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित रितीने व शांततेने पार पाडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे.