नवी मुंबई : नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार दिनांक १०/०९/२०२५ रोजी सिडकोतील सह-निबंधक कार्यालयातील १ अधिकारी, २ कर्मचारी व १ खाजगी इसम यांना लाच स्वीकारताना पकडले आहे.
या कारवाईमध्ये सिडकोत कार्यरत असलेल्या खालील लोकसेवकांचा समावेश आहे –
१) श्री. धनाजी दत्तात्रस काळुखे, सह नोंदणी अधिकारी, सहकारी संस्था – प्रतिनियुक्तीवर सिडकोमध्ये कार्यरत
२ ) श्री. राहुल रंगराव कांबळे, कार्यालयीन सहाय्यक – सिडको कर्मचारी
३) श्री. महेश गंगाराम कामोठकर, शिपाई – सिडको कर्मचारी
वरील सिडकोचे कर्मचारी राहुल रंगराव कांबळे व महेश गंगाराम कामोठकर यांचेविरुध्द निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्या लाचखोर वर्तनाबाबत सिडको सेवा नियमातील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे श्री. धनाजी दत्तात्रस काळुखे यांना सदर घटनेनंतर सिडकोमधून तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर निलंबन व शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस सिडकोतर्फे त्यांच्या मूळ विभागाकडे पाठविण्यात आली आहे.
सिडकोने त्यांच्या कामाकाजामध्ये अधिक पारदर्शकता ठेवून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जनतेची कामे वेळेवर पूर्ण करणे व कोणताही गैरप्रकार न करणे या संदर्भात विभाग प्रमुख यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. तसेच दक्षता विभागाकडूनही भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी वेळोवेळी संबंधित विभागांना निर्देश दिलेले आहेत.
सिडकोतर्फे समस्त नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणताही सिडकोच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांने किंवा त्यांच्या वतीने अन्य व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास सदर प्रकरणी तात्काळ सिडकोच्या दक्षता विभागास तक्रार नोंदवावी. अशा तक्रारीत तथ्य आढळल्यास अशा कर्मचाऱ्याविरुध्द कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल