पनवेल: खारघर मधील सेक्टर १० येथे निरसुख पॅलेस या नव्या बार अँड रेस्टॉरंट या हॉटेलला दारूविक्रीची परवानगी मिळाल्यामुळे लोकांमध्ये जो क्षोभ निर्माण झालेला आहे, त्यामध्ये ‘भारतीय जनता पक्ष’ हा पूर्णपणे नागरिकांच्या बाजूने असून, खारघर मधील बारला भाजपाचा ठाम विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतलेली आहे.
नो लीकर झोन म्हणून ओळख असणाऱ्या खारघर शहरात निरसुख पॅलेस नामक एका नव्या बार अंड रेस्टॉरंटला उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्रीची परवानगी दिली आहे, त्याला विरोध दर्शवत भाजपने ठोस भूमिका मांडली आहे.
खारघर शहराला शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. शहरामध्ये विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये अस्तित्वात असून खारघर शहराची नोंद “नो लिकर झोन” अशी अनेक वर्षांपासून आहे. खारघर मध्ये नागरिकांच्या मागणीनुसार गेली अनेक वर्षे दारूबंदी आहे व येथील भाजपाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार यांनी सातत्याने जनभावनेचा आदर करत या दारूबंदीचे ठाम समर्थन केल्यानेच या विभागांत अनेक वर्षे दारूबंदी जपली गेली. एवढेच नव्हे तर पनवेल महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपानेच सभागृहात पनवेल दारूमुक्तीचा प्रस्ताव मंजूर केला. परंतु नंतर प्रशासनाने योग्य पाठपुरावा न केल्याने योग्यप्रकारे त्या ठरावाची अंमलबजावणी झाली नाही. भारतीय जनता पक्षाने नेहमीच जनभावनेच्या आदर केला असून, याही वेळी भाजपा पूर्ण ताकदीने लोकांसोबत आहे. त्या अनुषंगाने या नवीन बार विरोधात् सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक यांनी आंदोलन पुकारल्यास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लोकभावनेचा आदर करून भाजपा पूर्णपणे नागरिकांसोबत असेल, असे खारघरच्या नागरिकांना आश्वासित केले आहे.