पनवेल: दोनशे वर्षांहून जुनी आणि परंपरांगत असलेल्या उलवे नोड मधील कोपर स्मशानभूमीवर तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला ग्रामस्थांच्या वज्रमूठ ताकदीमुळे रिकामे हाती परतावे लागले असून पुन्हा कारवाईला आल्यास सिडकोला जशाच तसे उत्तर देण्याचा अर्थात प्रखर विरोध करण्याचा निर्धार पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी कोपर स्मशानभूमी बचावासाठी आज जनआंदोलन उभारले. विजेचा कडकडाट आणि वादळी पाऊस असतानाही आंदोलक मागे हटले नाहीत. या आंदोलनालाची तीव्रता पाहता सिडकोने एक पाऊल मागे येत कारवाईला हात लावला नाही. मात्र कारवाई केल्यास आम्ही पण तयार आहोत असा इशारा सिडकोला देण्यात आला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तर यावेळी चक्क स्मशानभूमीत पार्थिव जळत असताना त्या ठिकाणी सिडकोच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करत निषेध केला. आजचा हा आवाज इशारा आहे पुन्हा कारवाई करायला याल तर दोन्ही तालुक्यातील लोकांचा जनआंदोलन करू असा सज्जड दमच सिडकोला दिला. जर सिडको पुन्हा असेच निर्णय घेत राहिले, आणि जनतेच्या भावनांचा विचार केला नाही तर सिडकोला रुद्र रोषाला सामोरे जावे लागेल. असेही त्यांनी ठणकावून सांगत ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी कुठलीही पर्वा करणार नसल्याचे अधोरेखित केले. सिडकोने केवळ न्यायालयाची दिशाभूल केली म्हणून हि वेळ आली आहे, असेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. एखादी कारवाई करायची असेल तर नोटीस द्यावी लागते. कोर्टाने अशी कोणतीही मुदत दिली नाही. परंपरागत स्मशान भुमी आहे. या ठिकाणी स्मशानभूमी आधी वसलेली आहे. नंतर कॉलनी बनली आहे. त्यामुळे मुळची व्यवस्था तशीच राहिली पाहिजे. कॉलनी वाल्यांना त्रास होऊ नये याची जबाबदारी सिडकोने घ्यायची आहे. हे सगळ न करता आपल्याला उखडून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. आज स्मशानभूमीच्या जागेवर डोळा असून, उद्या म्हणतील गावातील इतर सार्वजनिक सुविधा देखील हटवाव्यात, तिथे स्विमिंग पूल किंवा इतर प्रकल्प उभे करावेत. ही सिडकोची मनमानी आणि जनतेविरोधी भूमिका खपवून घेतली जाणार नाही. सिडकोची मनमर्जी कारभार सुरु आहे. तो चालवू द्यायचा नाही. पनवेल तालुक्यातील अनेक रहदारीच्या ठिकाणी स्मशान भुमी आहेत त्यांचा त्रास कोणालाही होत नाही मात्र कोपर गावातील स्मशानभुमीचा त्रास सिडकोला होतोय. त्यामुळे सिडकोच्या डोक्यावर आपल्याला बसाव लागेल. सर्वांनी यासाठी जागरूक रहा हे युद्ध आहे. पावसात भिजलो हे सांगून चालणार नाही. आपल्याला आता आरपारची लढाई करायची आहे. जे सिडकोचे अधिकारी जाणीव पुर्वक ग्रामस्थ आणि कॉलनीमधील रहिवाश्यामंद्ये सभ्रम निर्माण करुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा जाब आपल्याला लवकरच विचारायचा आहे. त्यामुळे येत्या काळात दोन्ही तालुक्यातील नागरीकांना एकत्रित घेऊन जसे दि. बा. पाटील साहेबांनी आंदोलन पेटवल होतं तसच आंदोलन आपल्याला कराव लागेल. केंद्र आणि राज्य सरकार हे जनतेच्या हिताचे काम करत आहेत पण हे सिडकोचे अधिकारी दिखावेगिरी करण्याचे काम करत आहेत, त्यामुळे आमचा लढा कायम राहणार आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोला ठणकावून सांगितले.