पनवेल, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती संभाजीराजे मैदानावर आज (१ मे) आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशा सेविका व महिला अग्निशामक कर्मचाऱ्यांना आयुक्तांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त सर्वश्री भारत राठोड व गणेश शेटे,परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त सर्वश्री डॉ. वैभव विधाते, प्रसेनजित कारलेकर, रविकिरण घोडके, मंगला माळवे, स्वरूप खारगे, सहायक आयुक्त श्रीराम पवार, डॉ. रूपाली माने, सुबोध ठाणेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, शहर अभियंता संजय कटेकर, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भगवान गीते, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर तसेच महापालिकेचे अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या वेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन करत ध्वजाला मानवंदना दिली.
पनवेल महानगरपालिकेच्या १० शाळांमध्येही ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी महापालिकेचे शिक्षक, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान*
वर्ष २०२४-२५ मध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
१. प्रथम पुरस्कार : श्रीमती सुनीता पांडुरंग साबळे
२. द्वितीय पुरस्कार : श्रीमती मेनका कृष्णात सावंत
३. तृतीय पुरस्कार : श्रीमती सुनंदा बाबू पेठकर
चौकट
यूएसएमधील अलाबामा येथे होणाऱ्या वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्स २०२५ स्पर्धेसाठी पनवेल महानगरपालिकेच्या महिला अग्निशामक शुभांगी घुले (गोळाफेक) व तेजश्री साळुंखे (टेनिस) यांची निवड झाली आहे. यावेळी या दोघींना आयुक्त श्री. चितळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.