सीबीडी, नेरूळ व एनआरआय सागरी पोलीस ठाण्यांकडून तब्बल १७.९६ लाखांचा जप्त मुद्देमाल नागरिकांना परत

नवी मुंबईतील परिमंडळ–०२, बेलापूर अंतर्गत येणाऱ्या सीबीडी विभागातील सीबीडी, नेरूळ व एनआरआय सागरी पोलीस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांत जप्त केलेला तब्बल १७ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्याचा वाटप कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. पोलीस उपायुक्त, परिमंडळ–०२, बेलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

चोरी, हरवलेले मोबाईल, वाहन व इतर गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल योग्य तपासाअंती संबंधित नागरिकांना परत करण्यात आला.

सीबीडी पोलीस ठाण्याने एकूण ०५ गुन्ह्यांमध्ये १ ऑटो रिक्षा, ४ मोबाईल फोन असा ₹१,५०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ११ मिसींग मोबाईल (₹१,२१,०००/-) शोधून काढण्यात आले. सीबीडी पोलीस ठाण्याचा एकूण मुद्देमाल ₹२,७१,०००/- इतका आहे.

नेरूळ पोलीस ठाण्याने एकूण ०६ गुन्ह्यांमध्ये सोने, चांदी, मोबाईल फोन व रोख रक्कम असा ₹७,२५,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय १७ मिसींग मोबाईल (₹२,००,०००/-) हस्तगत करून नागरिकांना परत करण्यात आले. नेरूळ पोलीस ठाण्याचा एकूण मुद्देमाल ₹९,२५,०००/- इतका आहे.

एनआरआय सागरी पोलीस ठाण्याने ३१ मिसींग मोबाईल फोन शोधून काढले असून त्यांची एकूण किंमत ₹६,००,०००/- आहे.

एकत्रित आकडेवारी
तीन्ही पोलीस ठाण्यांच्या संयुक्त कारवाईत
एकूण गुन्हे : ११
जप्त मुद्देमाल : ₹८,७५,०००/-
एकूण मिसींग मोबाईल : ५९
मिसींग मोबाईल किंमत : ₹९,२१,०००/-
असा एकूण ₹१७,९६,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तो मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला.

नागरिकांमध्ये समाधान
हरवलेले मोबाईल व मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर, सातत्यपूर्ण तपास व दक्षतेमुळे हे यश मिळाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मोबाईल किंवा अन्य वस्तू हरवल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. हरवलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्ण प्रयत्न करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *