सिडको जम्बो कोविड सेंटर मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

सिडको जंबो कोविड रुग्णालय वाशी येथे बरेच डॉक्टर्स आपल्या जीवावर उदार होऊन कोरोना सारख्या महामारीचा सामना करत रुग्णसेवा करत आहेत. अशावेळी त्यांना काम करण्यास पोषक वातावरण असणे गरजेचे आहे, अन्यथा त्याचा परिणाम डॉक्टरांच्या मानसिकतेवर व पर्यायाने रुग्णसेवेवर होऊ शकतो. अशी माहिती मिळते की सिडको जंबो कोविड रुग्णालय वाशी येथील प्रमुख डॉ. वसंत माने (नोडल अधिकारी) हे डॉक्टर व परिचारिका यांना नाहक त्रास देऊन त्यांना अपमानास्पद वागणूक देतात, महिलांशी नीट वागत नाहीत. त्याचप्रमाणे अनावश्यक व नियमबाह्य जाचक अटींमुळे येथील कोरोना योद्धयांना येथे काम करणे, फारच जिकरीचे जाते. याबाबत अनेकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुन पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई किंवा कोणतीही प्रतिक्रिया पहावयास मिळाली नाही. काही सूत्रांचे असेही म्हणणे आहे की डॉ. माने यांचे वरिष्ठाशी विशेष हितसंबंध आहेत त्यामुळे डॉ. मानेवर कारवाई करण्यात येत नाही. या सर्व बाबींमुळे डॉ.वसंत माने यांचे धाडस वाढतच आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ,  येथील महिला डॉक्टर व परिचारिका यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते एखाद्या विशेष सुंदर दिसणाऱ्या मुलींना “आज तू खूपच सुंदर दिसत आहेस” असे वक्तव्य करणे व जर कुणी त्यांच्या दालनात काही कामानिमित्त गेले असता त्यांना वरून खाली किळसवाण्या नजरेने न्याहाळून पाहणे. काही मर्जीतल्या डॉक्टर्स परिचारिका यांना त्यांच्या पसंतीच्या ड्युटी लावतात व जे अपेक्षित वागत नाहीत त्यांना जास्त काम असलेल्या ठिकाणी ड्युटी लावली जाते. महिलांशी असभ्य वागणाऱ्या पुरुष डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी यांची बाजू घेऊन, तक्रार मागे घ्यायला सांगून विषय संपवतात. एका महिला डॉक्टरने घरी सांगितलं तर घरच्यांनी तिलाच नोकरीं सोडायला सांगितली, म्हणून कोणी घरी सांगत नाही व पोलिसात जाऊ शकत नाही, अश्या तक्रारी येथील महिला करत आहेत.

सिडको कोविड सेंटर येथील डॉक्टरांना कारोना योद्धा म्हणून काम करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका तर्फे मानधन दिले जाते. त्यासाठी प्रत्येक महीन्याच्या शेवटी डॉक्टरांची हजेरी पालिकेला पाठवली जाते. ही हजेरी पाठविण्याचे सर्व अधिकार डॉ.माने यांना आहेत व ते त्याचा गैरवापर करतात असे निदर्शनास येते. येथील सेंटर वर डॉक्टर्स सकाळपाळी, दुपारपाळी व रात्रपाळी अशा ३ सत्रात २४ तास कार्यरत असतात. जर एखादा डॉक्टर काही कारणाने गैरहजर राहिल्यास त्याची हजेरी खालीलप्रमाणे कमी केली जाते
सकाळच्या सत्रात गैरहजर असल्यास प्रत्येकी २ दिवसांची, दुपारच्या सत्रात गैरहजर असल्यास २ दिवसांची आणि रात्रीच्या सत्रात गैरहजर असल्यास ३ दिवसांची हजेरी कमी करून त्यांच्या मानधनात कमालीची कपात केली जाते. त्यामूळे त्यांना मुळात असलेले मानधन व प्राप्त होणारे मानधन यामधील फरक प्रकर्षाने जाणवतो.

त्याचप्रमाणे डॉक्टर व ईतर कर्मचारी यांना उपलब्ध केले जाणारे PPE Kit, N95 मास्क, ग्लोव्हज हे कधीकधी निकृष्ट दर्जाचे असून ते वापरण्यायोग्य नसतात. काही वेळा तर हे साहित्य एकदा वापरून पुन्हा Recycle केलेले असल्याचे आढळते. त्याचप्रमाणे वार्ड मधील उपकरणे उदा. Pulsoxymeter, BP Apparatus, ECG Machine आदी उपकरणे दुरावस्थेत असल्याने रुग्ण तपासणीमध्ये बरेच अडथळे येतात, BP Apparatus साठी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना दुसऱ्या वार्डमध्ये शोधाशोध करावी लागते. बरेच Pulsoxymeter हे मोडकळीस आलेले आहेत. ECG काढणे म्हणजे डॉक्टरांसाठी तारेवरची कसरत करण्यासारखे आहे कारण संपूर्ण सेंटरमध्ये एकच ECG Machine असून तीही कधी कधी कार्यरत नसते किंवा चुकीचे निष्कर्ष देते. याबाबत डॉ. माने त्यांच्याकडे येथील डॉक्टर व परिचारिकांनी वारंवार तक्रार करूनही ही समस्या सोडवली जात नाही. उलट यासाठी डॉ. माने त्यांनाच जवाबदार ठरवतात. या सर्व साहित्याच्या दर्जा बद्दल तडजोड केली जाते व यामध्ये काहि काळाबाजार होत असावा, असाही संशय व्यक्त केला जातो

सूत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *