लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोखाडा महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

पनवेल(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा जपत शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय आणि प्रेरणादायी काम करणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पालघर जिल्हयातील मोखाडा येथील ए. एस. सी. महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा (मंगळवारी) पार पडला.
सामाजिक अंतर नियमाचे पालन करून मोखाडा येथे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगिरथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव, ठेकेदार संतोष चोथे, महाविद्यालय स्थानिक समिती सदस्य कुणाल लाडे, संस्थेचे इन्स्पेक्टर संजय मोहिते, पीआरओ बाळासाहेब कारंडे, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. डॉ. यशवंत उलवेकर, उपप्राचार्य प्रा. संदनशीव, प्रा. जे. बी. वारघडे, प्रा. डॉ. संतोष जाधव, प्रा. डॉ. अमोल ममलय्या, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता कर्मवीर अण्णांनी समाजासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली. आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशभर शिक्षणाची पंढरी निर्माण झाली, अशा महान कर्मवीर अण्णांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे वाढविण्याच्या दृष्टिकोनातून लोकनेते रामशेठ ठाकूर स्वतः कार्यरत असून दुसऱ्यांनाही ते प्रेरीत करीत असतात. त्यांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेच्या अनेक विद्यालयांच्या इमारतींची उभारणी झाली असून त्यांचे योगदान समाजाला प्रेरणादायी ठरले.
मोखाडा विभाग अतिदुर्गम आहे, असे असले तरी या भागातील विद्यार्थी आधुनिक शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लक्ष केंद्रित केले. त्या अनुषंगाने या ठिकाणी महाविद्यालयीन विज्ञान विद्यार्थ्यांकरिता अडीच कोटी रुपये खर्च करून दोन मजली इमारत उभारली जाणार आहे. या इमारतीत आधुनिक लॅबोरॅटरी, ग्रंथालय, सेमिनार हॉल, लेक्चर हॉल व इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी सतत सर्वस्वी योगदान देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या इमारतीच्या उभारणीसाठी ०१ कोटी रुपयांची भरीव देणगी ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड कंपनीच्या वतीने देण्याचे जाहीर केली होती. त्यातील ५० लाख रुपयांचा धनादेशही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूमिपूजनाच्या मुहूर्तावर संस्थेचे उपाध्यक्ष भगिरथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी शिंदे यांच्यासह सर्व उपस्थित रयत सेवकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *