सिडकोतर्फे खास पोलिसांसाठी साकारण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेस उस्फूर्त प्रतिसाद

सिडकोतर्फे पोलिसांसाठी असलेल्या ४४६६ घरांच्या योजनेचा शुभारंभ मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक २७ जुलै २०२० रोजी व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून करण्यात आला. या योजनेस पोलिसांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एका दिवसात ५०० पोलिसांनी या गृहनिर्माण योजनेसाठी नोंदणी केली आहे.

सदर गृहनिर्माण योजने अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांकरिता नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये ४,४६६ सदनिका साकारण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता उपलब्ध असणाऱ्या या योजनेतील सदनिका या केवळ मुंबई महानगर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकरिताच राखीव आहेत. एकूण ४,४६६ सदनिकांपैकी १,०५७ सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि ३,४०९ या अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत.

सदर योजनेकरिता अर्जदारांची नोंदणी, शुल्क भरणा, सोडत इ. सर्व प्रक्रिया या अत्यंत सुलभ व पारदर्शक अशा ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. याकरिता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या या गृहनिर्माण योजनेतील घरे अत्यंत माफक दरात व उत्तम दर्जाची असून या योजनेच्या माध्यमातून पोलिसांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *