पनवेल उपजिल्हा रुग्णालय व पनवेल महापालिका देवेंद्र फडणवीस यांची भेट

पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झालेला आहे. परिणामी दररोज २०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे या भागात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिकेला भेट दिली. त्यांनी मनपा आयुक्त आणि रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून कोरोना विशेष स्थिती आणि उपचाराबाबतचा आढावा घेतला.

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या वर गेली आहे. आता २४ तासात जवळपास दोनशे रुग्णांची नोंद होत आहे. मृत्यूचा आकडाही शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी वाढती रुग्ण संख्या चिंतेची बाब ठरु लागली आहे. दरम्यान नव्याने स्थापन झालेल्या पनवेल मनपाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्याच बरोबर इतर वैद्यकीय सुविधा सुद्धा तोकडया आहेत. पनवेल ग्रामीण भागांमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे पन्नास रुग्णांची नोंद होत आहे. ग्रामीण भाग रुग्णांच्या बाबतीत महापालिकेशी स्पर्धा करताना दिसत आहे. ही गोष्ट अतिशय चिंता व्यक्त करणारी आहे. दरम्यान पूर्ण रायगड जिल्ह्यात पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम हॉस्पिटल हे दोनच कोविड रुग्णालय आहेत.कोरोनाविषाणू ची साखळी तोडण्यासाठी पनवेल महापालिकेने तसेच तालुका प्रशासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल ला भेट दिली. त्यांच्यासमवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रायगडचे माजी पालकमंत्री आ.रवींद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, निरंजन डावखरे, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर विक्रांत पाटील आदी उपस्थित होते. फडणवीस यांनी सर्वात अगोदर पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या व्यवस्था, रुग्णांवर होत असलेले उपचार त्यासंदर्भातील अडचणी याविषयी आढावा घेतला. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी माहिती दिली. दरम्यान रुग्णांना बेड मिळत नसल्याने गैरसोय होत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी सांगितले.त्यानंतर दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांनी पनवेल महापालिका जाऊन कोरोना विषयक स्थितीचा आढावा घेतला. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात अधिकचे रुग्ण सामावून घेण्याची क्षमता संपत आलेली आहे. त्यामुळे आणखी व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *