राष्ट्रपतींची रायगड किल्ल्याला भेट-छत्रपती शिवाजी महाराजांना केले अभिवादन

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (06 डिसेंबर 2021 रोजी)महाराष्ट्रातील रायगड किल्ल्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

राष्ट्रपती म्हणाले की शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. ही सदिच्छाभेट माझ्यासाठी एखाद्या तीर्थयात्रेसारखी आहे असे त्यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांच्या समर्थ नेतृत्वाखाली, या संपूर्ण प्रदेशाच्या वैभवात वाढ झाली आणि देशभक्तीची भावना पुन्हा निर्माण झाली, असे ते म्हणाले. 19 व्या शतकातील ‘शिवराज-विजय या  संस्कृत ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अत्यंत प्रभावी वर्णन केले आहे याचा त्यांनी उल्लेख केला. देशातील जनतेला, विशेषतः युवा वर्गाला महाराजांच्या महान व्यक्तिमत्त्वाशी परिचित होता यावे आणि महाराजांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य समजून घेता यावे यासाठी या ग्रंथाचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर केले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी भविष्यकाळाचा वेध घेणारी होती. महाराजांनी त्यांच्या ‘अष्टप्रधान’ नामक मंत्रिमंडळाच्या मदतीने दूरदर्शी परिणाम साधणारे अनेक निर्णय घेतले असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील पहिल्या आधुनिक नौदलाची उभारणी केली याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *